Saturday, August 1, 2009


`शिवराज्य पक्ष, महासंग्राम पार्टी संयुक्‍तपणे लढणार`
सकाळ वृत्तसेवा
Saturday, July 04th, 2009 AT 12:07 AM

नागपूर - सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक शिवराज्य पक्ष आणि महासंग्राम पार्टी संयुक्‍तपणे लढविणार असल्याची माहिती महासंग्राम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसीच असावा, मंडल आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी, उच्च शिक्षण संस्थांचे राष्ट्रीयीकरण, मातृशक्‍तीचा सन्मान, सत्तेमध्ये महिलांचा सहभाग, संख्येएवढी सत्ता, संख्येएवढे आरक्षण आणि सत्तेच्या दलालापासून बळीराजाची मुक्‍ती, तसेच नागपूरला मिनी मंत्रालय आदी मुद्द्यांवर उभय पक्ष संयुक्‍तरीत्या निवडणूक लढविणार आहेत. प्रा. वाकुडकर म्हणाले, आगामी निवडणुकीसाठी समविचारी नवीन आघाडी तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात 288 जागांवर आम्ही उमेदवार उभे करणार आहोत.महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मुक्‍तीचे, सन्मानाचे, ओबीसी बहुजनांच्या अस्मितेचे, उद्योजक कामगारांच्या समन्वयाचे, सत्तेमध्ये स्त्रियांच्या सहभागाचे आणि समस्त वंचितांसाठी न्यायाचे पर्व सुरू करण्यासाठी शिवराज्य पक्ष आणि महासंग्राम पार्टी एकत्र आले असल्याचे शिवराज्य पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा जयश्री शेळके यांनी सांगितले.

शिवराज्य पक्ष विधानसभेच्या२८८ जागा लढविणार
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, July 29th, 2009 AT 12:07 AM

औरंगाबाद - शिवराज्य पक्ष राज्यातील समविचारी पक्षांना सोबत घेऊन राज्यातील विधानसभेच्या सर्वच्या सर्व २८८ जागा लढविणार असून शेतकरी व सैनिकांच्या हातात आर्थिक सत्ता यावी, हा आमच्या पक्षाचा अजेंडा असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार कर्नल सुधीर सावंत यांनी मंगळवारी (ता. २८) येथे पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पक्षाची भूमिका सांगताना सावंत म्हणाले, की राजकीय घराणेशाही मोडून काढण्यावर पक्षाचा भर राहाणार असून, सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडविण्यासाठी पक्ष पुढाकार घेणार आहे. काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून, उर्वरित उमेदवारांच्या मुलाखती लवकरच घेणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले. ५० टक्‍के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले, तसेच शिवराज्य पक्ष सर्वसमावेशक असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला. जयश्री शेळके, चक्रधर शेळके, दादाराव कुबेर, राहुल बनसोड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.



No comments: