sambhaji brigade
"मराठ्यांना आरक्षित करा, अन्यथा सुरक्षित राहणार नाही' - संभाजी ब्रिगेड
पुणे, ता. ५ - मराठा समाजाला आरक्षित-सुरक्षित केले नाही, तर राज्यकर्त्यांनाही सुरक्षित राहू देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांनी आज दिला.मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मराठा आरक्षण रॅलीचे आज पुण्यात स्वागत करण्यात आले. त्या वेळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड, श्रीमंत कोकाटे, शांताराम कुंजीर, सारिका भोसले, विजयकुमार ठुबे, संतोष शिंदे, तुषार काकडे, अर्चना जगताप, वासंती नलावडे, संतोष नानवटे, प्रभाकर दुर्गे आदी या वेळी उपस्थित होते. चोंदे म्हणाले, ""आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या निकषात बसूनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. सध्याचे सरकार हे प्रस्थापितांचे सरकार असून, तातडीने आरक्षण जाहीर करावे, अन्यथा संघर्ष तीव्र करण्यात येईल.'' दरम्यान, आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजानेही जुनी मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे मत प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले. समाजात या बाबत अज्ञान आहे आणि दुसरीकडे राजकीय इच्छाशक्ती नाही. त्यामुळे आरक्षण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे. साठ टक्के समाज हा दारिद्य्ररेषेखाली असेल, तर तो फक्त शेतीवर जगू शकत नाही; त्याला उभा करण्यासाठी आरक्षणासारख्या सवलतींची गरज आहे, असेही ते म्हणाले. सरकारने सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि इतर मागासवर्गाच्या आरक्षणात वाढ करावी, अशी मागणी कोकाटे यांनी केली.
मराठा समाजाचे करमाळ्यात आंदोलन
करमाळा, ता. १९ - मराठा समाजाला ३५ टक्के आरक्षण द्यावे, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने २५ जुलैला सकाळी दहा वाजता बायपास चौक येथे मराठा समाजाचे सर्वपक्षीय "रास्ता रोको' आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सुर्वे यांनी दिली.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. सुर्वे यांनी म्हटले आहे, की गेली १८ वर्षे मराठा समाजाला सामाजिक, शैक्षणिक आरक्षण मिळविण्यासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व अन्य ३२ कक्ष सातत्याने लढा देत आहेत. परंतु सातत्याने मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी राजकीय पुढाऱ्यांनी समाजाची फसवणूक केली आहे. त्या विरोधात मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यंत उग्र आंदोलने करण्यात येतील. त्याचाच एक भाग म्हणून २५ जुलैला "रास्ता रोको' करण्यात येणार आहे. या आंदोलनात मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन श्री. सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन खटके यांनी केले आहे.
'संभाजी ब्रिगेड'ची पंढरपुरात दगडफेक
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या 'बाइक'स्वार कार्यर्कत्यांनी रविवारी पंढरपुरात ३ एसटी गाड्यांची तोडफोड केली. यामध्ये आठ जण जखमी झाले. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेडने रविवारी अचानक दगड हाती घेत एसटी गाड्यांना लक्ष्य केले. पंढरपूर-नगर रस्त्यावर कार्यर्कत्यांनी नगरकडे जाणाऱ्या व पटवर्धन कुरोलीकडे जाणाऱ्या दोन एसटी बसच्या काचा फोडल्या. प्रवाशांनी खचून भरलेल्या या गाड्यांवर हल्ला चढवल्याने एकच घबराट उडाली. त्याचवेळी पंढरपूर-सोलापूर रस्त्यावरही या कार्यर्कत्यांनी असाच गोंधळ घातला. तेथेही एक एसटी बस फोडली. दगडफेकींच्या या घटनांमुळे एसटी प्रशासनाने बससेवा स्थगित केली.